नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार   

श्रीनगर/ नवी दिल्ली : पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर सलग दुसर्‍या दिवशी विनाकारण गोळीबार केला. त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले, अशी माहिती लष्करी सूत्रांनी शनिवारी दिली.पहलगाममधील नरसंहारानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ल्यात २६ जणांना प्राण गमवावे लागले. यात बहुतांश पर्यटकांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक पावले उचलण्या सुरूवात केली आहे. 
 
पाकिस्तानी सैन्याने गुरुवारी रात्रीही नियंत्रण रेषेवरील (एलओसी) भारतीय चौक्यांवर गोळीबार केला होता. त्यावेळी भारताने चोख प्रत्युत्तर दिले होते.२५ आणि २६ एप्रिलच्या रात्री काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर विविध पाकिस्तानी सैन्य चौक्यांकडून विनाकारण गोळीबार करण्यात आला, असे सूत्रांनी सांगितले. भारतीय जवानांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, असेही सूत्रांनी सांगितले.पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या हल्लेखोरांना आणि त्यामागील सूत्रधारांना कठोर धडा शिकवला जाईल, असा इशारा भारताने दिला आहे. त्यामुळे पाकिस्तान बिथरला असून त्याने सीमेवरील सैन्यात वाढ करण्यास सुरूवात केली आहे.

Related Articles